कोजागिरी पौर्णिमा विशेष : काय आहे कोजागिरीचे महत्व? ; पूजन करून होणार पौर्णिमा साजरी

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: अश्‍विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री एक वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो. असे मानले गेले आहे. पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंन्द्र सोळा कलांनी परिपूर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खूप महत्व आहे. अशी माहिती वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडव गुरुजी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.

कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज कोजागिरी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी केली आहे. दूध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर दूध उपलब्ध करून दिले आहे. सकाळपासून नागरिकांची देखील दूध, मसाला खरेदीसाठी लगबग सुरू आहे. त्यात कोजागिरीमागची आख्यायिका आणि महत्त्व यावर दैनिक सांजवार्ताने प्रकाश टाकला आहे. यात अनंत पांडव गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्‍विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवून त्यात केशर आदी मसाला घालून ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधून अधिक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करते. यामुळेच पुर्वीपासुन ऋषीमुनींनी दूध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगीतले आहे. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.

कोजागिरीची आख्यायिका

रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास आयोजित केला होता. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणे समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने अनेक प्रकारच्या वनौषधी या चंद्र प्रकाराच्या किरणाने सिद्ध होतात. लंकाधीपती रावण या अश्‍वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे आरश्‍याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त  होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगीतली आहे. तसेच या रात्री महलक्षमी आकाशातून भ्रमण करते आणि कोजागरती अर्थात कोण कोण जागरण करतय हे पाहाते. आणि जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो म्हणुन देखील या दिवशी जागरण करण्याचे विशेष महत्व आहे.

कोजागिरी पौर्णिमेला अंत्यत महत्व: अनंत पांडव गुरुजी

कोजागिरीच्या पुण्य परवा काळावर मेरू श्री यंत्राची आपल्या घरी आपल्या व्यवसाय स्थानावर आपण स्थापना करून विशिष्ट प्रकारे उपासना केल्याने अनेक प्रकारचे कर्ज निवारण धनवृद्धी मनोकामना पूर्ती होते. या कोजागिरीच्या पुण्य पर्वकाळावर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आपण इंद्र लक्ष्मी आणि चंद्र यांचे पूजन करून त्यांचे औक्षण करावे. त्या चंद्राचे त्या दुधामध्ये प्रतिबिंब पाहून पूजन करून नमस्कार करावा व ते दुध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने 108 वेळेस जप करावा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. या पुण्य पूर्व काठावर आपण कनकधारा स्तोत्र श्रीसूक्त देवी अथर्वशीर्ष यांचे सोळा पाठ करून भगवती महालक्ष्मीची प्रार्थना केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असेही वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडव गुरुजी यांनी स्पष्ट केले.